This is article written by Deepa Palashikar published in Maharashtra Times, Sunday (12-07-2009). Its really must read article.
सध्या चौथीचा इतिहास हा चचेर्चा विषय बनला आहे. इयत्ता चौथीला शिवाजीमहाराजांच्या स्वराज्यस्थापनेची ओळख करून देणारे पुस्तक आहे. हा विषय शिकवतांना वीरश्रीच्या पलिकडे जाऊन मुलांना स्वातंत्र्याची प्रेरणा समजावणे, हा इतिहास शिक्षकाच्या पुढील एक जटिल प्रश्न असतो. इतिहास शिकवतांना अनेकदा शिक्षकच भावनेच्या आहारी जाण्याचा धोका असतो. तसे न करावे तर इतिहास केवळ सनावळ्यांची जंत्री बनून जातो व मुलांना त्यात रस वाटेनासा होतो. पाठ्यपुस्तकाची भाषाही चौथीच्या मुलांना समजेल अशी नाही. मुलांच्या भावविश्वात नसलेले दाखले देणारी अलंकारिक भाषा या पुस्तकात आहे.भावनात्मकता टाळून त्याचा वर्तमानाशी संबंध जोडून मुलांना त्यात रस निर्माण करण्यासाठी शिक्षकाला नेहमीच सज्ज राहावे लागते. 'आनंदनिकेतन' या नाशिकच्या प्रयोगशील मराठी शाळेत असे आव्हान पेलायला उत्सुक शिक्षिका असल्याने त्या नित्यनवीन प्रयोग करून काही तरी नवा मार्ग शोधतातच.
शिवरायांच्या मृत्यूनंतरच्या पाठांत शिवरायांची युद्धनीती, राजकारणनीती याची चर्चा आहे. हे पाठ मुलांना खूप कंटाळवाणे वाटतात. कारण शिवरायांच्या जीवनातील नाट्य त्यात नसते. या पाठांत एक वाक्य असे आहे की, 'जवाहिरा जसे मोती पारखून घेतो, त्याप्रमाणे एकेक गुण पारखून शिवरायांनी माणसे निवडली.' त्यावरून वर्गात चर्चा सुरू झाली की शिवरायांना कोणते गुण असलेली माणसे हवी असतील? यावर विचार करुन मुलांनी शौर्य, प्रामाणिकपणा, प्रसंगावधान, स्वाभिमान, निर्णयक्षमता अशा १६ गुणांची यादी केली. मग तुम्हाला शिवरायांच्या सैन्यात सामील व्हायचे असेल तर आणि यादीतील गुण तुमच्यात असतील तर तुम्ही शिवरायांकडे अर्ज करा, असे सांगितले. फक्त सैन्यासाठी की कुठल्याही कामासाठी अर्ज करायचा का? असे मुलांनी विचारले. सर्वच मुलांनी उत्साहाने व हिरीरीने अर्ज लिहिले. त्यातली बालसुलभता व मोकळेपणा मोहून टाकणारा आहे.
साक्षीने लिहिले की 'तुम्ही काढलेल्या कंपनीत आपण काम करण्यास तयार आहोत!' तर 'मी तुमचे नाव फार ऐकून आहे, आपण फितुरी करणार नाही; पण शत्रूला फितूर करुन घेऊ,' असेही काहींनी लिहिले.
या पत्रांना अनपेक्षितपणे शिवाजीमहाराजांचे उत्तर आले!
माझ्या आनंदनिकेतन मधील मावळ्यांनो,
तुमची पत्रे मिळाली. स्वराज्याच्या कार्यात तुम्हीही सामील होऊ इच्छित आहात, हे वाचून आनंद वाटला. शौर्य, आत्मविश्वास, एकनिष्ठा यात तुम्ही कधीच कमी पडणार नाही, याची मला खात्री आहे. मला तुमचा सच्चेपणा खूपच आवडला. रोहिणीने लिहिलंय : 'मला थोडसंच युद्ध करता येतं, पण मी अमात्य म्हणून जमाखर्च ठेवण्याचं काम करेन.' स्वराज्यात सर्वच गुणांची गरज आहे आणि सर्वच कामे सारख्याच महत्त्वाची आहेत.
तुम्ही मुलं स्वराज्यासाठी जे काम करता त्याकडे माझे लक्ष असते. नाशकात पुस्तकप्रदर्शनाच्या आयोजकांनी काम झाल्यावर सर्व कचरा तसाच टाकून दिला, हे पाहून मला फार वाईट वाटले. पण मग तुम्ही आनंदनिकेतनची सातवीची मुले व काही जागरुक तरुणतरुणींनी मिळून आपल्यापरीने कचरा आवरला, हे पाहून मला फार आनंद झाला. शिवजयंतीला वा नंतर काही लोक मिरवणुका काढतील, पण त्यांपेक्षा स्वच्छता करणारी मुलेच माझे खरे मावळे म्हणून मला प्रिय आहेत. कारण आता आपली लढाई आपल्यातील दुर्गुणांविरुद्धच आहे. त्यासाठीही तेवढेच शौर्य लागणार आहे, जेवढं लढाईला लागत होतं. तुम्हा सर्वांना मी माझ्या सैन्यात घेतलंय. पण आता केवळ मारामारी करायच काम करुन चालणार नाही. हा देश सुंदर बनवायचा आहे. गरिबांना शिक्षण मिळवून द्यायचे आहे. आपल्यापेक्षा जो दुबळा असेल, त्याला मदत करायची आहे.
या कामात तुम्ही मदत करणार ना?
यापुढेही मला जरुर पत्र पाठवत राहा. माझेही तुमच्याकडे लक्ष आहेच.
तुमचा
शिवाजी महाराज, रायगड
हे उत्तर शाळेत लावल्यावर एकच खळबळ उडाली. मुलांना खूप आनंदही वाटला आणि अविश्वासही! ताईंनीच आपल्याला शिवराय बनून उत्तर लिहिलंय, असे मुलांना वाटत होते. मुग्धा तर म्हणालीच, 'ताई, आम्ही आता स्कॉलरशिपची परीक्षा दिली आहे, तुम्ही आम्हाला फसवू शकत नाही!' तरीही सर्व मुलांनी त्या पत्रास तातडीने उत्तरे लिहिली. त्यात आपण यापुदोही प्लास्टिक, कचरा, घाण होऊ नये या साठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले. चिन्मय खोचे या मुलाने तर पोस्टकार्ड लिहून 'शिवाजीमहाराज, रायगड' या पत्त्यावर पाठविले!
याही पत्रांना शिवाजीमहाराजांचे उत्तर आले. पण यावेळी शिवाजीमहाराजांनी सही करतांना आपला शिवराय असे लिहून आपलेपणा व्यक्त केला होता!
तुम्ही मला तातडीने पाठविलेली उत्तराची पत्रे मिळाली. प्लास्टिक, कचरा, घाण
हेही आपल्या देशाचे शत्रू आहेत हे तुम्हाला मनापासून पटले, याचा मला खूप आनंद वाटला. तुमची सहल जाणार आहे असे कळले. सहलीत तुम्ही चांगलेच वागाल, याची मला खात्री वाटते. ही सहल समुदावर जाणार आहे. आपल्या स्वराज्याचे पहिले आरमार मी बनवले होते, हे तुम्हाला माहित असेलच. माझ्या आरमाराचा प्रमुख कान्होजी आंग्रे याच्या विषयी तुमच्या शाळेतील अरुणदादा चांगली गोष्ट सांगतात. तुम्ही ती ऐकली नसेल, तर ताईंना सांगून त्यांना बोलावून जरूर ऐका आणि समुदाची माहितीही गोळा करा. आपल्या भारताला एवढा मोठा समुद किनारा आहे पण आपल्याला समुदाची माहितीच नाही. यामुळेच आपण इंग्रजांकडून पराभूत झालो. आताची लदााई शस्त्राची नाही, तर ज्ञानाची आहे. तेव्हा खूप ज्ञान मिळवा आणि स्वराज्याचे रक्षण करा.
मलाही तुम्हाला भेटायला यायचे आहे, पण स्वराज्य राखायचे तर सगळीकडे
सारखे फिरावे लागते. तेव्हा वेळ आली की जरूर भेटू. तोवर पत्र लिहीत राहा.
शिवराय, रायगड
हे दुसरे पत्र आल्यावर तर मुलांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली. हे खरे शिवराय असणे शक्यच नाही असे त्यांना मनोमन वाटत होते. मग पत्र पाठविणारी व फक्त ताईंनाच ठाऊक असलेली व्यक्ती कोण? या विषयी चर्चा सुरू झाली. त्यांनी इतर ताईंनाही विचारून बघितले. पण कोणीच दाद लागू देईना. पत्रव्यवहाराची ही साखळी अशीच वाढवत न्यावी का? अशी चर्चा शिक्षिकांमध्येही सुरू झाली. पण यातून मुलांमध्ये भ्रामक कल्पना पसरतील व ते अंतिमत: चांगले ठरणार नाही असे वाटले.
मात्र या रहस्याचा भेदही तितक्याच दमदारपणे करावा असे ठरले. 'सम्राट अशोकाची दैनंदिनी' या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन मी मुलांसाठी 'शिवरायांची दैनंदिनी' या प्रकल्पाची आखणी केली. शिवाजीमहाराजांच्या संबंधात पुस्तकात उल्लेखिलेल्या सर्व व्यक्तींनी आपली दैनंदिनी लिहिली, तर ते काय लिहितील, याची कल्पना करुन मुलांनी लिहावे, असे सांगितले. शिवरायांच्या कालखंडाचे साधारणपणे ३० टप्पे करुन प्रत्येक टप्प्यातील महत्त्वाच्या व्यक्ती निवडल्या. मुले मनापासून लेखन करीत होती. जिजाबाईंपासून बडीबेगम पर्यंत आणि व्यंकोजीराजांपासून अफझलखानापर्यंत सर्वांची मनोगते मुलांनी दैनंदिनीच्या रुपात लिहिली. त्यांच्या लेखनात मी जराही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे ती अगदी बालसुलभ निरागसतेने नटलेली आहेत.
उदा. लहानपणी एका मावळ्याच्या घरी शिवाजीराजांना बोलावले जाते, असा प्रसंग एका मुलाने लिहिला आहे. त्यावेळी 'आई! मी या काकूंकडे जेवायला जाऊ का?' असे बालशिवाजी आईला विचारतो! व्यंकोजीच्या मनात निर्माण झालेल्या शंकेचे वादळ एका मुलाने लिहिले आहे. त्या दैनंदिनीविषयी वर्गात चर्चाही झाली.
शिवराय म्हणून कोण लिहित आहे हे जाणण्याची मुलांना उत्सुकता होती. हा रहस्यभेद करण्यासाठी या 'दैनंदिनीं'चे पुस्तक दस्तुरखुद्द शिवरायांच्या हस्ते प्रकाशित करण्याचे ठरले!
शेवटी हस्तलिखित तयार झाले. त्याच्या प्रकाशनासाठी शाळेतील अरुणदादा व पाहुण्या विभावरी देशपांडे यांना बोलावले. ताईंनी मुलांना विचारले : यातले कोण शिवाजी असेल? बहुसंख्य मुलांनी विभाताईकडे बोट दाखविले. शेवटी दीपाताईंनी हस्तलिखित प्रकाशनासाठी अरुणदादांकडे दिले आणि मुले म्हणाली, 'अरे! हा शिवाजी तर आपलाच निघाला!'
शिवराय व विद्यार्थ्यांच्या पत्रसंवादाने एक नक्की झाले. मुले आत्मविश्वासाने लिहू लागली. त्यांच्या मनातील स्वराज्य विषयक जाणीवांची चर्चा सुरू झाली. 'आम्ही शिवाजीच्या काळात जन्मलो असतो तर आम्हीही शौर्य गाजवले असते, देशासाठी काही केले असते,' असे म्हणणाऱ्या मुलांना आपला शत्रू आता बदलला आहे आणि त्याच्या विरुद्ध लढण्याचे मार्गही बदलले आहेत, हे उमजले. मात्र या लढाईतही वेगळ्याप्रकारचे शौर्य लागतेच हेही मुलांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचले. देशासाठी काही तरी करायच्या मुलांच्या ऊजेर्ला योग्य दिशा मिळाली. दैनंदिनी लिहितांना दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत शिरून विचार करायला मुलांनी सुरुवात केली. इतिहासाला दोन बाजू असतात आणि दुसरी बाजूही महत्त्वाची व दखलयोग्य असू शकते, या दिशेने मुले विचार करू लागली. आपली मते बनवतांना काय काळजी घ्यायला हवी, याचेही संस्कार कळत न कळत मुलांवर झाले. अनेक नव्या गोष्टीविषयी त्यांनी माहिती मिळवायला सुरुवात केली. इतिहास वर्तमानाशी जोडला नाही, तर मिथ्याभिमानाचे ओझेच केवळ मानगुटीवर बसते. यातून शिक्षकांची आणि मुलांची सुटका झाली तर किती तरी नवीन गोष्टी घडू लागतात. नेहमीच्या नीरस प्रश्नोत्तरापेक्षा यात मुले मनापासून रमली. त्यांनी लेखनाचे नवनवे प्रकार हाताळले. भाषा समजून घेतली, त्यातील शब्दांचे वजन समजून घेतले, भावनांचे योग्य प्रकटीकरण करायला शिकली, हे सर्व ताईंनी इतिहास वर्तमानाशी जोडल्याने झाले.
शिवाजीमहाराजां विषयी केवळ भावनिक उमाळे आणून हे साध्य झाले असते का? इतिहासाकडे पहाण्याचा एक विकृत दृष्टीकोन गेल्या काही वर्षांपासून सर्वत्र पसरतो आहे. त्या पलीकडे मुलांना नेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता.